Aamhi ShabdaBhramar

Friday, December 23, 2005

सायुज्यता

तुझ्या मनी विचारांचे काहूर माजता
त्याचे पडसाद दिसती माझ्या मुखावर

तुझ्या श्वासां-श्वासांत असे माझा प्राणवायु
तुझे हे जगणे करे मला दिर्घायु

माझ्या मनी विचारांची खळबळ माजता
तुझ्या मुखातुन झिरपते माझीच कविता

तुझ्या आनंदात माझे स्मित दडे
तुझ्या प्रसन्नतेत माझा उत्साह ओसंडे

तुला वाटते दोन देहांची गरज न काही
भार एकाचाही मज सहन होत नाही
- विश्वेश

कळलेच नाही!!!

कळलेच नाही!!!
चाफ्याच्या फुलांच्या कधी झाल्या मुंडावळ्याकळलेच नाही!!!
आंब्याच्या तळ्यांचे कधी झाले मांडव डहाळे ... कळलेच नाही
माजघरातल्या अंधारात कधी लागले डोहाळे..... कळलेच नाही
चिंचेची बोरांची कधी लागली जिभेला शिरशिरी.. कळलेच नाही
तांबडं फुटताना दारी कधी आला वासूदेव.... कळलेच नही
रामाच्या मंदिरात कधी सुरू झाली काकड आरती..... कळलेच नाही

शिवपूजनाला बसताना गालावरचे काजळ कधी तोंडभर पसरले.... कळलेच नाही
तरण्या पोरींना घे‌ऊन कधी पारन्या निघालो.....कळलेच नाही
देव चोरताना ताम्हणात कधी सुटली सुपारीची मूठ ...कळलेच नाही
अंगावरची हळद अन.. हातातील कट्यार कधी ओघळली सुटली.... कळलेच नाही
कळलेच नाही कधी तालुक्याच्या गावी सुरू झाले काडीमोड
गावकीच्या जत्रेत भावकीची भांडणे अन एक दोघांचे खून
कळलेच नाहीत
शेता शेतांचे कसे झाले बांध अन.. बांधा बांधांवर कशा आल्या हीरो होंडा
कळलेच नाही, कळलेच नाही
एस. टी. स्थानकासमोर कधी आली चक्री अन सुरू झाला बी‌अर बार
मळीच्या वासाने कारखान्याच्या धुराड्याने पांढरील छेद देत डांबरी सडकेने कसा
साधला डाव कळलेच नाही
कळलेच नाही चावडीवरल्या पेट्रोमक्स वर आले कसे रात किडे
कळलेच नाही
बरवेतला महादेव,वेशीतला मारुती,रानातला खंडोबा, अन गावातला विठोबा
कधी निद्रीस्त झाले कळलेच नाही
टिटवीने साधला डाव, निपचीत पडला माझा गाव
कळलेच नाही, कळलेच नाही

वाटतं कधी कधी मलाही

वाटतं कधी कधी मलाही
मन मोकळं करावं
बंधनाचे पाश तोडून
लांब कुठे उडून जावं.......

वाटतं कधी कधी मलाही
खुदकन हसून लाजावं
'How sweet' म्हणून


कुणीतरी मलाही म्हणावं........

वाटतं कधी कधी मलाही
कोणावर प्रेम करावं
समोरच्याला सगळं दे‌ऊन
आपण मात्र रीतं व्हावं..........

वाटतं कधी कधी मलाही
कोणालातरी जिंकावं
लटका राग,गालावर हसू
आणि डोळ्यातच त्या हरवावं........

वाटतं कधी कधी मलाही
कळी सारखं खुलावं
फुलाच्या त्या सुगंधाने
मन कोणाचं मोहरावं.........

वाटतं कधी कधी मलाही
येत्या पावसात भिजावं
थेंबांच्या त्या साक्षीनेच
कुणीतरी आपलं वाटावं.........
- रसिका

अजून एक रात्र

अजुन एक रात्र
तुझी वाट पाहत जागणार,
आज नक्की येशिल,
असं मन माझं सांगणार..

मग मी कागदांवरच्या
शब्दांमधे हरवणार,
रोज एक कविता करून
रोज एक चुरगाळणार..

आत कुठेतरी माहीत असतं,
तू नाही येणार कधी,
पण मन माझं वेडं आहे
कोण ह्याला समजावणार?
पापण्या जरी मिटल्या,
तरी तास तास मी जागणार,
अजून एक रात्र,
तुझी वाट पाहत राहणार..
- मंदार

माझा वेडा पा‌ऊस

माझा वेडा पा‌ऊस
तो पा‌ऊस,
ज़ेव्हा मला भेटला होता ना ,
तेव्हा तो वेडा नव्ह्ता आणि ....
माझाही नव्ह्ता..
तो ,ढ्गांच्या गडगडाटाशिवाय,
आणि भेदरवणा-या वा-याशिवाय कोसळ्णारा,
एक साधा सरळ पा‌ऊस होता...

एकदा त्याने मला भिजवायचं ठरवलं,
मग मीही भिजायचं नक्की केलं!
तशी छ्त्री होती ना सोबतीला..
पण तीचा कधी उपयोग होतो का?

मग तो पा‌ऊस आधी वेडा झाला..
कारण तो थांबायला विसरला..
आणि मग तो माझा झाला
कारण मी मलाचं विसरून भिजत राहीले

भेटायचयं का तुम्हाला त्याला...?
कधी आलातं तर..
त्याच्यासाठीचं बांधलेल्या..


माझ्या मनाच्या चंद् मॊळी घरातं..
बरसताना दिसेल तुम्हाला.....माझा वेडा पा‌ऊस!!!
-विभावरी

वाट

या वाट बघण्यातही गोडवा आहे
प्रेमाच्या कळ्यांचा ओलावा आहे
ह्रदयाच्या भावना अशा काही साठतात

वाटे त्याच माझ्या डोळ्यात सागर लाटतात

पण वाटे नंतरचं ते मीलन
त्यात त्याच शब्दांची रूणझूण..
मग निघून जातो वेडा वेळही कसा...
अणि परत येते..ती वेडी नशा..

बेधुंद ह्रदयात
परत वाट, आणि परत त्या लाटा
यालाच म्हणतात प्रेम
अश्याच असतात आयुष्यात छटा
- प्रियांका

नवीन पहाट....

सरलेले दिवसही
इतिहास जमा होतात
उष:कालाच्या उम्बरठ्यावरती
डोळेही नवीन स्वप्न पाहतात

विरलेल्या सुरांनंतर
शब्द तेच राहतात
मनालाही जसे
नवीन सूर गवसतात

स्मृतींच्या धुरात विस्मृत हो‌ऊन
मनाच्या भटकंतीतही कधी
चालता चालता
नवीन पायवाटा मिळतात..

नव्हते जे आपले कधी
त्याच्या गमावण्याचे दु:खही
उरलेल्या क्षणांनाच
आपले मानतात

होते ती नवी पहाट
मिळतात विरलेले सूरही
परत होतं मन ओलंचिंब
भिजून स्वप्नांच्या धुंद पावसात
- प्रियांका

विरह

शब्दात कसे सांगु,
शब्दच झाले मुके
तुझ्याविन जीवनाचे,
रंग झाले फिके.

ह्रदयात साठल्या,
आठवणी कोवळ्या
अश्रूत वाहील्या,
प्रितीच्या पाकळ्या

ह्रदयात सागर हा,
शांत जरी बसतो
वेदनांच्या लाटेसंगे,
अंतरी घुसमुटतो.
-वैभव

आठवण


तु गेलीस आणि
विखुरले सारे क्षण
भूतकाळात जगतो आहे
मी विसरुन वर्तमान

बागेतल्या फुलांनाही
तुझा छंद होता
तुझ्या केसात रेंगाळणारा
वाराही जरा मंद होता

वारा झाला स्तब्ध
फुले गेली कोमेजून
तुझ्या आठवणींचा गंध राहीला
शवासात माझ्या कोंडुन !!
-वैभव

रात्रभर

रात्रभर मी अंगणात बसून राहीन, आणि चादर ओढुन तुझी वाट पाहीन...

तू कधी गेलीस, हे मला कळलच नाही,
तु गेल्यावर आता काही उमजतच नाही..

रात्रभर मी अंगणात ...

तू गेलीस,ठीक आहे, मी बोलणार नाही काही,
पण तुझ्या आठवणी घेवून जा, त्या मी ठेवणार नाही..

रात्रभर मी अंगणात ...

आठवणी ठेवणं, मला खरच अशक्य आहे,
कोणी गेल्यावर आठवणींमध्ये, फक्त दु:ख आहे..

रात्रभर मी अंगणात ...

पण आज मी निर्णय घेतलाय, तुला जा‌ऊ द्यायचा,
आपल्या प्रत्येक क्षणांना,आज रात्री विसरायचंय..

रात्रभर मी अंगणात ...

पा‌उस पडला तरी मला भिजावस वाटणार नाही,
कारण भिजलो तर उब देणार आता कोणी नाही..

रात्रभर मी अंगणात ...

तू खरंच जा आत, मी नाही बघणार मागे वळून,
शांतपणे निघून जा‌ईल, माझी वाट धरुन..
-मंदार

उरेल का... दिवाळी

फटाका काय उडत राहील फक्त दारु संपेस तोवर
फराळ काय पोटात राहील फक्त उद्या उजाडेस तोवर

कपडा काय नवीन राहील फक्त कॉलर मळेस तोवर
किल्ला काय मांडला जा‌ईल फक्त मुले लहान तोवर

शुभेच्छा काय वाचली जा‌ईल फक्त पत्र मिटेस तोवर
रांगोळी काय देखणी राहील फक्त फिसकटेस तोवर

पुजा काय केली जा‌ईल फक्त तिथी पालटेस तोवर
ओवाळणी काय टाकली जा‌ईल फक्त पैसा बोलतोय तोवर

दिवाळी काय साजरी हो‌ईल चार दिवस सरेस तोवर
मग ही चार दिवसांची राणी अशी कितीशी पुरणारं ...

हे दिवस सरल्यावर काहीच नाही का उरणारं ?

फटाका काय उडत राहील फक्त दारु संपेस तोवर
पण डोळ्यात साठवलेली आतषबाजी तर उरेल ना

फराळ काय पोटात राहील फक्त उद्या उजाडेस तोवर
पण जिभेवर रेंगाळलेली ती चव तर उरेल ना

कपडा काय नवीन राहील फक्त कॉलर मळेस तोवर
पण त्या कॉलर मधली ताठ मान तर उरेल ना

किल्ला काय मांडला जा‌ईल फक्त मुले लहान तोवर
पण इतिहासातुन मिळालेली प्रेरणा तर उरेल ना

शुभेच्छा काय वाचली जा‌ईल फक्त पत्र मिटेस तोवर
पण त्यांच्यामागे जपलेली आपुलकी तर उरेल ना

रांगोळी काय देखणी राहील फक्त फिसकटेस तोवर
पण रेखाबद्ध जीवनातली रंगसंगती तर उरेल ना

पूजा काय केली जा‌ईल फक्त तिथी पालटेस तोवर
पण पूजा केली त्याचं स्मरण तर उरेल ना

ओवाळणी काय टाकली जा‌ईल फक्त पैसा बोलतोय तोवर
पण प्रेमानी बांधलेलं नाजुक नातं तर उरेल ना

दिवाळी काय साजरी हो‌ईल चार दिवस सरेस तोवर
पण चार दिवसांच्या कौतुकाची आठवण तर उरेल ना


मग ही चार दिवसांची राणी अशी कितीशी पुरणारं ...
हे दिवस सरल्यावर काहीच नाही का उरणारं ?
उरेल नक्की एक नियम... काहीचं नसलं जरी सदैव उरणारं
तरी सगळं संपल्यावरसुद्धा ; असतं खुप काही उरणारं
-
योगी

मन माझं..

मन माझं..
तिच्या सुंदर चेहऱ्यामध्ये
मन माझं रमायचं
तिच्या निरागस हास्याच्या
झोक्यांवरती झुलायचं

आयुष्याची स्वप्नं रंगवताना
रात्र रात्र जागायचं
झोप जरी लागली तरी
तिच्याच स्वप्नात रमायचं

खुपदा निश्चय करायचं की
आता तिला सांगायचं
समोर ती आली की मात्र
हळूच लपून बसायचं

ती निघून गेली की मग
स्वत:वरतीच चिडायचं
अन कधी स्वत:च्या भित्रेपणावर
खळाळून हसायचं

शेवटी एकदा निश्चय झाला
ठरलं तिला बोलायचं
उरी जपलेलं हळवं नाजूक
गूज मनीच सांगायचं

पण नशिबातच नव्हतं त्याच्या
तिचं उत्तर मिळायचं
त्याच्या दैवामधेच होतं
अधांतरी लटकायचं

नाही उत्तर मिळालं तरी
त्याचं थांबलेलं नाही झुरायचं
तिच्या आठवणी उराशी घे‌ऊन
आतल्या आत जळायचं

वास्तवाचं कटू सत्य नाही
कधीच त्याला पटायचं
म्हणूनच मला प्रश्न पडलाय
आता कसं याला समजवायचं?
-
सौरभ कुलकर्णी

मी कलाकार...

तुम्हाला फक्त तो एक कागद दिसतो,
माझ्या शब्दान्चा मी बाजार मांडत आहे,
त्यात मी माझे अश्रु विकतोय,
तुम्ही त्यालाही टाळ्या वाजवताय?

तुम्हाला फक्त ते एक रंगमंच भासते,
माझ्या कलेचे मी प्रदर्शन मांडतोय,
त्यात मी माझ दु:ख सजवतोय,
तुम्ही त्यालाही हसताय?

ती फक्त थोडीशी मातीच असते,
माझे हात मी त्यात झिजवत आहे,
त्यात मी माझी भूक लपवतोय,
तुम्ही त्यालाही घरात सजवताय?

ते एक रंगीत जगच वाटते,
त्या कुंचल्याचाच आकार मी घेतोय,
माझ्या भावनांची ती उधळण आहे,
तुम्ही त्याचीही प्रशंसा करताय?

हो मला करायचय लग्न...

हो मला करायचय लग्न,
शब्दाला मोठ्यांच्या मान दे‌ऊन,
कारण त्यान्नी जास्त पावसाळे(?) बघितले.
हो मला करायचेय माझे भविष्य त्यांच्या हाती,
मला खेळायचाय आंधळी कोशिंबीरीचा खेळ,
कारण 'ते'ही तर खेळलेचना.

हो मला अंधारात चाचपडायचय,
मला बांधायची घंटा माझ्या गळ्यात,
कारण समाज बघतो आहे ना !!

हो मला मिळणार आहे प्रेम,
'त्यांनी' शोधून दिलेल्या खेळण्याकडून,
कारण मी समजवतो आहे ना माझ्या मनाला...

हो सुखी होणार आहेत सर्व लोक,
'त्यांना' मिळणार आहे आनंद,
कारण मी वाढवतो आहे ना आमचा 'वंश'.

हो मला दाबायच्याय माझ्या भावना,
'त्यांना' त्यांची 'ईज्जत' सांभाळायचीय,
कारण मीच तर आहे त्यांचा 'लाडका' मुलगा.
हो मला करायचाय खून माझ्या प्रेमाचा,

मी तर अजुन लहानच आहे ना,
कारण मला वाढवलेना 'त्यांनी' आजपर्यंत.
हो मला खरच लग्न करायचय.

प्रेमाचा अर्थ...

प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
ओठांमधे इतके सामर्थ्य नव्हते,
तुला दूर जातांना पाहूनही ते उघडले नाही,
ते फक्त कवितेतच कर्तुत्व दाखवतात.

प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
तुझ्या डोळ्यासमोर हरले माझे डोळे,
एवढ्या सात वर्षातही ते 'चुकले' नाही,
ते फक्त कागदाच्या तुकड्यावरच बोलतात.

प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
माझा स्पर्शही तुला सांगू शकला नाही,
तुला 'त्या'च्याबरोबर पाहूनही हाताने सीमा राखली होती,
ते फक्त कल्पनेतच जागे होतात.

प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
माझ्या श्वासही खोटेच बोलत होता,
शरीराचा अंत पाहूनही ते वळले नाही,
ते फक्त 'पडद्यावरच' वळतात.

तु फक्त 'लाल-हिरव्या कागदासाठी' माझा हात सोडला,
तोच तुला माझ्या प्रेमपत्रापेक्षा जवळचा वाटला,
तेव्हा मीही तो प्रेमाच्या तराजुत तोलला,
आजतर मलाही ह्र‌दय हलके वाटायला लागले,
पण आता फार उशिर झाला होता, प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळला होता...

चेहरा

माणसाची ओळख सांगतो चेहरा,
चेहऱ्याच्या शोधात ही असतो चेहरा,
चेहरा सांगतो भाव माणसाचे,
हाव भावाची ओळख चेहरा ।

एक चेहरा, एक माणुस,
एक कहाणी प्रत्येक चेहऱ्याची,
कधी चेहरा काही तरी सांगतो,
काही चेहरा वाचताही येतो ।

चेहरा हसतो , रडतो ही चेहरा,
प्रत्येकाच्या भावना सांगतो चेहरा,
चेहरा असतो व्यक्तीमत्वाचा नमुना,
प्रत्येक चेहऱ्यामागे अस्तित्वाच्या खुणा ।

कविता साकारताना

सहजच कधी यमक जुळतात,
असेच काही शब्दही सापडतात,
मनामधली नकळत कविता,
उतरते अशीच कागदावरती.

रात्रीचा होतो दिवस,अन
शब्द घोळतात मनामध्ये,
कविता ही होते साकार,
'ती' ही उजाडलेल्या पहाटेमध्ये.

फक्त वाचतो कविता,
असं, कधीच म्हणत नाही
पण...,एखादं पुस्तक देखील
लयी शिवाय वाचत नाही.

एक कविता..., वाचुन,
थोडे आता बस्स म्हणतो,
एकच कविता 'ती' ही नकळत
थोडे म्हणता, कितीदा वाचतो.

फाटलेला..., कागद...,
अन त्यावर कधी लिहिलेल्या
अर्धवट कवितेच्याच...?
त्या तुटक ओळी.....

ती ही उतरते... ' कधी कधी '
कवितेमधुन शब्दांमध्ये...
शब्द देखिल, माझेच असतात
पण...?, मनच नसते स्वत:मध्ये...

अशीच साकारतो..!, कविता..?
उसवलेल्या शब्दांमधून...
आता मन देखिल माझेच असते,
अन कविता देखिल..? परकी होते.....

मन


अनेक विचार येथेच जन्मले
अनेक भावना येथेच दुखावल्या
स्वप्नाच्या जगातही प्रवेश याचा
प्रत्येक खेळात सह्भाग मनाचा

मनामुळे आपणाला सगळं समजतं
मनच मात्र पुरते नाही कळत
ते नेहमीच असल्याचे भासते,
पण, मनच कधी भेटत नसते

मनात नेहमीच धिंगाणा शब्दांचा
येथेही खेळ चालतो भरती-ओहोटीचा
मनानीच शब्दांना दिला थारा
शब्दांमुळेच मिळाला मनाला सहारा

मनानीच माणसाला दिली जिद्द
आळसासाठी ही मनच सिध्द,
असामन्यतेत ही मनाचा वाटा
सामान्यतेला असतो मनाचाच फाटा ।

मनानीच विचाराना दिली गती
परिणामी झाली माणसाची प्रगती
मनानीच विचार दिले,
याच मनानी स्वप्न पहिले ।

मनाला कधी कोणी
का न पाहीले,
मनाबद्दलचा विचारही,
शेवटी मनातच चाले ।

व्यर्थ...

शंभर वाक्यं बोलशील,
ते निर्वाणीचं वाक्य लांबवण्यासाठी
शंभर कारणं खपवशील,
मनातली तगमग लपवण्यासाठी ॥

शिळ्या विनोदांना फोडणी देशील,
गप्पांमधे पावसापाण्यालाही ओढशील
मोठ्या हुशारीने खरं ते लपवशीलही,
पण त्या भाबड्या नजरेचं काय करशील?

'आज सांगायचंच', रोज ठरवशील,
समोर आल्यावर उसना आवही आणशील
'वेळ आल्यावर सांगू', अचानक माघारी वळशील,
'बोलायला हवं होतं', परतीला शब्द घुमतील ॥

किती दिवस ताणून धरशील,
कधीतरी असहाय्य होवून तोंड उघडशील
'आता खूप उशीर झाला', स्वत:च शिक्कामोर्तब करशील,
तुझ मन शांत अन मला व्यर्थ धगधगत ठेवशील ॥

शब्द

आज मनात ठरवलं,
एक 'सुंदर' कविता करुया
गोड-गुलाबी शब्द पेरुन,
तिला जरा नटवूया-सजवूया

पण शब्दच रुसून बसले,
मागे हटून बसले
ओळख दाखवेनासे झाले,
हटवादी मेले, एकेकटे सुचू लागले

त्यांचा ताळमेळ काही लागेना,
अन माझी कविता काही सजेना
खूप मनधरणी करुनही,
ते काही माझं ऐकेनात

मग मी शब्दांचा नाद सोडला,
म्हणाले, खुशाल रुसा बापड्यांनो
किती दिवस ओळख विसराल,
कधीतरी माझी आठवण काढाल

ब-याच उशिरा मग एक कल्पना सुचली,
लिहिताना मधेच निद्रादेवी अवतरली
मग मी निवांत हिंडले स्वप्नदेशात,
अन कविता उशाशी जागत राहिली

पहाटे पहाटे पायाला गुदगुल्या झाल्या,
तेच शब्द एकमेकांशी खेळत होते
डोळे तांबारलेले, चेह-यावर वेडी आशा,
मला जाग आलेली पाहून, वेडे चक्क आनंदी झाले!

सांगशील मला कधी?

प्रेमाचा अर्थच नव्हे,
त्याची व्याप्ती सांग मला
मी जे जे अनुभवलं,
प्रेमच म्हणतात का त्याला?

त्याचं दर्शन घेणं,
हा तर केवळ दिनक्रम झाला
डोळे मिटूनही तोच दिसणं,
हा भलताच उपद्रव झाला!

तो असल्यावर प्रसन्न वाटणं,
हा कदाचित योगायोग असावा
तो नसल्यास बेचैन होणं,
ह्याचा अर्थ काय लावावा?

तो कधी हसून बोलला,
आभाळाला हात टेकतात
जाणून बुजून दुर्लक्ष केल्यावर,
पाय जमिनीवर आणतात

मला त्याचा सहवास मिळेल
ही अपेक्षाच मुळी उणी
पण म्हणून का लगेच,
मनाला आवर घालू शकतं कोणी?

त्याला त्याचे प्रेम मिळो,
अडसर नको कधीच
माझ्या वाटेवर मृगजळ होतं,
समजून घे‌इन आधीच

'प्रेमाशिवाय जगणं शून्य',
असं का आहे थोडीच?
'आपण प्रेम करु शकलो', ही भावना,
समाधान दे‌इल नक्कीच!

म्हणून विचारते, खर सांग,
ही जाणीव कसली?
प्रेमंच जर नव्हतं, तर मग,
ही हुरहूर कसली?

सहज म्हणून..

सहज म्हणून जगतानाही,
कितीतरी नवीन अनुभव येतात
काही मनावर कोरले जातात,
काही अलगद विस्मृतीत जातात ॥

कधी कोणाला दिलेलं वचन,
सहज म्हणून मारलेली पैज
जगणं अटींनी बांधत जातात,
क्षणिक सुखानं सांधत जातात ॥

कधी गमतीत केलेली मस्करी,
एखादं हळवं मन दुखावून जाते
पुढच्या वेळी जपून वागण्याची,


मनाला शिकवण दे‌ऊन जाते ॥
सहज म्हणून सुचलेला किस्सा,
वातावरणातला ताण सैलावत जातो
कधी दोस्तांसोबत केलेल्या 'भंकस'मुळेही,
नवीन कामाला जोम मिळतो ॥

जगताना कळतही नाही,
कशा आठवणी साठत जातात
कधीतरी निवांत क्षणी लक्षात येतं, जेव्हा,
अशा साठवणी आठवत जातात ॥

मीलन

आज आपण परत भेटलो,
नेहमीसारखेच.....अपघाताने!
मनात शंकांचं काहूर घे‌ऊन,
धडधडत्या काळजाने....

आज मला बोलायचंच होतं,
तुलाही आजच बोलायचं होतं
एकमेकांचा अंदाज घेत,
एकमेकांना सामोरं जायचं होतं...

म्हणलं आधी तुला संधी द्यावी,
तुझं मन आधी मोकळं करावंस
अन तुझ्यात गुंतलेलं माझं मन,
पिसासारखं हलकं व्हावं...

आज तू बोलला नाहीस,
तर मी बोलणारंच होते,
शेवटी एक कोणीतरी बोलल्यावरंच,
आपलं नशीब हे वळण घेणार होते...

आज माझी तगमग तुला समजली,
जणू माझ्या मनाची हाक तू ऐकलीस
'हो म्हण ना गं', हेच ना ते शब्द,
ऐकल्यावर पुढे शुद्ध कोणाला राहिली...


खरंच...

जमलंय मला सावरायला,
जमलंय उसनं हसायला
नात्यांच्या ह्या गोत्यातून,
स्वत:चं भावविश्व आकारायला

पूर्वी मी चिडायचे,
भांडलेही खूप नशिबाशी
आता मात्र खरंच जमलंय,
हटवादी मनाला समजवायला

असते मी गप्पांमधे,
जमवलंय लोकांमधे मिसळायला
आता बोचरी जखम टोचली गेली तर,
आवर घालते विव्हळण्याला

कोणीही नव्हतं तरी,
'मी' होते माझ्या विश्वात
जमलंय त्या विश्वातल्या,
स्वत:ला परत मिळवायला

कळतील मलाही जगाचे नियम,
उलगडतील समीकरणे
झगडतीये अजुनही,
केवळ स्वत:साठी जगायला

कशासाठी जगण्यासाठी …

एक सुंदर गीत हवं, सुख-दु:ख गुंफून गाण्यासाठी,
एक सुरेल सरगम हवी, जीवनाच्या तारा जुळवण्यासाठी ।

एक सच्चा रसिक हवा, समेवर दाद मिळवण्यासाठी,
असं बेभान संगीत हवं, स्वत:ला हरवून बसण्यासाठी ।

एक सुवासिक फूल हवं, आयुष्य सुगंधित करण्यासाठी,
एक खोल श्वास हवा, जगण्यातली अनुभूती घेण्यासाठी ।

एक उराशी स्वप्नं हवं, कल्पनेचे मनोरे रचण्यासाठी,
एक मेहनती क्षण हवा, स्वत:ला कृतार्थ करण्यासाठी ।

एक जहरी अपयश हवं, अहंकार जागेवर आणण्यासाठी,
एक अंधारा कोपरा हवा, आशेचा किरण मिळवण्यासाठी ।

एक रडवणारी धावपळ हवी, स्वत:ला आजमावून पाहण्यासाठी,
एक सशक्त स्थैर्य हव, मनोबल टिकवून धरण्यासाठी ।

एक धगधगता निखारा हवा, जगाची ओळख पटवण्यासाठी,
एक मायेचा पदर हवा, भिजल्या पापण्या टिपण्यासाठी ।

एक उत्स्फूर्त विनोद हवा, ताणतणाव विसरण्यासाठी,
क्वचित एखादा योगायोग हवा, आश्चर्यचकित होण्यासाठी ।

एक खरी मैत्री हवी, अवघड क्षणी सावरण्यासाठी,
एक अखंड साथ हवी, जगणं हवंहवंसं वाटण्यासाठी ।

एक संस्कारित मन हवं, आदर्श घालून देण्यासाठी,
खरोखर एक आयुष्य हवंच, कशासाठी?...जगण्यासाठी ।


खूप दिवस झाले असतील..

खूप दिवस झाले असतील...
लहाणपणी अंगणात मैत्रिणींसोबत खेळतानामधूनच चिडून उठून गेलीस,
आणि लिंबामागे जाउन लपून बसलीस;
पण कुणीच आलं नाही तुझी समजूत काढायला
मग तुझी तुच उठून गेलीस सरपण आणायला...

खूप दिवस झाले असतील...

आठवतं एकदा पाण्याला गेलेली असतानामधेच आमराईत रेंगाळलीस,
कै-यांच्या आंबटओल्या गंधानं मोहरुन गेलीस
पण, कोकिळेच्या कूजनामागून जेव्हा 'माय'ची हाक आली-
दिस ढळायच्या आत परतण्यासाठी तुझी लगबग सुरू झाली...

खूप दिवस झाले असतील...
तव्यावरची भाकरी तव्यावरच करपली होती
कुणास ठाउक कुठे तू अगदी हरपली होती
मग तू भानावर कशी आली ते तुल ठाउकच आहे
मानेवरचा दाह अजून कुठेतरी खोलवर जळतच आहे..

खूप दिवस झाले असतील...

पत्र्यातून झिरपणा-या चांदण्याकडे बघून
'त्या'ला उठवावं असं मनात आलं असेल दाटून
ते मनातलं चांदणं मनातच साठवून ठेवलंस
मन मारुन जगायचं अंगवळणी पाडून घेतलंस...

खूप दिवस झाले असतील...

खरंच खूप दिवस झाले असतील आता...
आपण खूप सोसलं वगैरे ही जाणीवही नसेल आता
पण, तू साठवून ठेवलेलं चांदणं तुझ्या डोळ्यांतून सांडत असतं
अन तुझीच कहाणी तुझ्याही नकळत गदगदून मांडत असतं...

खूप दिवस झाले असतील...

दु:ख

लहरत गेले झाड धुक्यातून
अन हसले आभाळ जरासे
थेंब दवाचे असे थबकले
अन फसले आभास जरासे..

तळ्याकाठची रानकेतकी
झुके तळ्याशी उगीच जराशी
रुप न्याहाळता डोहामधले
थरथरले थेंब जरासे..

उगीच हसणे रुसणे उगीचच
कारणाविना अन मुसमुसणे
गीत स्वरांचे ओथंबलेल्या
ऐकुनि थांबले पक्षी जरासे..

ती येता मग गर्द सावली
डोहामध्ये अंधार साचला
स्मितांच्या प्रतिबिंबाखालून
एक जन्मले दु:ख जरासे..

उगीच हसणे रुसणे उगीचच
कारणाविना अन मुसमुसणे
गीत स्वरांचे ओथंबलेल्या
ऐकुनि थांबले पक्षी जरासे..

ती येता मग गर्द सावली
डोहामध्ये अंधार साचला
स्मितांच्या प्रतिबिंबाखालून
एक जन्मले दु:ख जरासे..

ती अशी लाडाने जवळ येते तेव्हा...

ती अशी लाडाने जवळ येते तेव्हा
आकाशातली चांदणी हातात आल्याचा भास होतो
किंवा असेही नाही,

कसल्या अनामिक गंधाने भरून राहिलेला श्वास होतो.
ती अशी लटिके रुसू पाहते तेव्हा
आकाशातला चंद्र ढगातहळूच लपून बसतो

किंवा असेही नाही,

माझा मिश्कील शब्दही उगिच जपून असतो.
ती अशी डोळे भरून उदास पाहते तेव्हा
आकाशातली नक्षत्र थोडी हलल्यासारखी वाटतात

किंवा असेही नाही,

मेघांच्या रांगा मनातूनचालल्यासारख्या वाटतात.
ती माझी कविता माझ्याचसमोर वाचते तेव्हा
तिच्या डोळ्यांतून माझीच नव्यानेओळख मला होत असते,

किंवा असेही नाही...

नाते अनामिक दोघांमधले दोघांनाही कळत-नकळत
वळण सुंदरसे घेत असते...
ती अशी लाडाने जवळ येते तेव्हा...

डोळे

डोळे ,किती वेडे असतात
ह्रदयातलं गुपीत अलगद
प्रतिबिंबात उतरवतात,
ओठांपेक्षाही गोड हसतात
मनापेक्षाही तरलतेने झुरतात

खरंच..डोळे वेडे असतात..

कधीच न परतून येणाऱ्याच्या वाटेकडे उगाच
वळून वळून पाहत राहतात..
अन‍ वेड्या प्रतिक्षेत
रात्र रात्र जागवतात

खरंच..डोळे वेडे असतात..

चांदण्यांनी डवरलेलं आकाश सोडून
अनामिक काजव्यालाच शोधत राहतात..
स्वत:च्याच नकळत मनाशी बंद करुन
स्वत:च मग झरायला लागतात

खरंच..डोळे वेडे असतात..

-विभावरी


डोळे

डोळे शहाणे असतात...
अवघडतात शब्द ओठी
अन मनात न सुटणा-या गाठी
पापणी लवून तेव्हा डोळेच प्रतिसाद देतात
डोळे शहाणे असतात...

दूर वर न परतणा-या वाटा
छातीत खोल सलणारा काटा
कुढ्या मनाला करीत मोकळे डोळे बरसतात
डोळे शहाणे असतात...

जेव्हा मी कुणीच नसतो –

जेव्हा मी कुणीच नसतो –
निराकार सावल्यांप्रमाणे
क्षितीजावरती लोंबत असतो,
अंधाराच्या मागे लपुनी
शिळा हॊउनी आंबत असतो.

बुरशीलाही बुरा यावा अन
गंजालाही चढावा गंज,
किड्यांच्याही डोक्यात घुमावी
भणभणणारी झांज.

जेव्हा मी कुणीच नसतो –


अशी गजबज होता मस्तकी
चित्ताला ये जरा शांतपण,
या शांतीच्या माथ्यावरि पण
नश्वरतेचे घण चिरंतन .

जेव्हा मी कुणीच नसतो –

असण्याचा सारे काही
अर्थ अचानक सुटू लागतो,
या नसण्याचा त्या असण्याशी
संबंध भराभर तुटू लागतो...

जेव्हा मी कुणीच नसतो –

भर दुपारी...

भर दुपारी निघून गेलीस
तेव्हा तुझ्या अंगावरचं
नितळ मुलायम झुळझुळीत पिवळं वस्त्र
झगझगीत उन्हाबरोबर फडफडत राहिलं
कितीतरी वेळ...

तुझ्या प्राजक्तविभोर आठवणी
संध्याकाळच्या कातर क्षणांना
सांगू लागलो अंगणात
तेव्हा, आधीचेच कललेले
चाफ्याचे झाड
अजून जरासे कलले
एक दीर्घ नि:श्वास टाकत...

रात्रीच्या भव्य पटावर
तुझे नक्षत्रांकित डोळे
चांदण्यांमधे
सर्वत्र दिसले. सर्वत्र दिसले
त्यात लपलेले माझे प्रतिबिंबही...
आणि त्यानंतर अता
ही अशी पहाट उगवली आहे सखे –तुझ्याशिवायची...
दिवसाचा प्रदीर्घ रस्ता तुडवताना,
जर कधी श्रमलोच,
तर तुझ्या अंगावरचं
नितळ मुलायम झुळझुळीत पिवळं वस्त्र
फक्त फडफडत राहू दे माथ्यावरून...बस्स.

पतंग

ऐक पामरा खेळ पतंगाचा काय तूला सांगतो
खेळ मनाचा कसा खेळावा हेच तूला दावतो ॥

उगाच शंका,हेवे-दावे,भूत-भविष्य नी खुळ्या कल्पना
पतंगास जसे अडथळे तशाच जनांच्या वल्गना

मार्ग तयातून ज्यास लाभला तो पतंग नभी संचरतो(२)
ऐक पामरा ... ॥

पराक्रमी असुनीही मज विनयातच उत्कर्ष शोभतो
कणा जो व्यर्थ गर्वी लढला, सहज तया वारु मोडतो

नमूनी कणा पतंग स्वार वारूवर होतो(२)
ऐक पामरा ... ॥

दोराला मज काच लावुनीच मी नित्य उंच जातो
खेळ नव्हे संघर्ष असे हा,रोज मृत्यु नाचतो

जो दक्ष तोच भाग्यवान या जगी ठरतो(२)
ऐक पामरा ... ॥

आठवण

पण आता सकाळ झालीय,
माझ्या हातात नवीन दिवस आलाय,
नवीन दिवस काहीतरी कुणाचे तरी ऐकण्यासाठी,
प्रेम करण्यासाठी,
कुणासोबत किंवा एकटेच चालण्यासाठी,
माझ्याच उत्कर्षासाठी,
मी आहे या नवीन दिवसासाठी,
नी स्मरतोय त्यांना जे सरलेत
कालच्या सूर्यास्तासमवेत

वाट

कसली बरं वाट पाहतो आहे मी
स्वतःलाच फसवून जगतो आहे मी
काय करायचय नी काय टाळायचंय
सगळंच तर कळतंय
कुठेतरी आत मात्र काहीतरी जळतंय
विझवायचं सोडून तेल ओततोय मी
कसली बरं वाट पाहतो आहे मी...

समोरच तर दिसताहेत आकाक्षांचे डोंगर
तिथेच तर जायचंय
एकटाच जाऊ म्हटलं तर तेही सलतंय
हातावर हात ठेवून कुणासाठी बसलोय मी

कसली बरं वाट पाहतो आहे मी...
शब्द, सुख, शब्दसुख, दुःख, वेड, दुःखवेड
मीच तर माझ्यासाठी आणलंय
तेवढंच कसंबसं पुरेल तिथपर्यंत पोहोचायला
उगाचच भागीदार शोधत बसलोय मी

कसली बरं वाट पाहतो आहे मी...

किती मी जपावे....

किती मी जपावे या भावनेला
सांगण्यास हे, तो चंद्र रात्र जागलेला ॥

तू येता सूर्योदय, जाता सूर्यास्त
तूच घाल फूंकर, मी असा भाजलेला

किती मी जपावे या भावनेला...

हसणे वाहता झरा, रडणे श्रावणातली सर
हवेत सूर्यकिरण माझ्या इंद्रधनुला

किती मी जपावे या भावनेला...

रुसणे, क्षणात मजकडे सरसावणे
या कसल्या गं अजब लीला

किती मी जपावे या भावनेला...

एकटक पाहाणं, धीर देणं, डोळ्यात शोधणं
खरं सांग, आहे का मी इतुका भला
किती मी जपावे या भावनेला सांगण्यास हे, तो चंद्र रात्र जागलेला ॥

वास्तव

काटे मनात फीरवून जेव्हा दीस हा सरतो
मनामध्येच जेव्हा तिचा हात मी धरतो
अशा सांजवेळी सूर्य थोडा रेंगाळतो
मी मनात तो नभी रंग उधळून पाहतो

त्याचा निरोप घेता घेता जेव्हा माघारी वळतो
एकटेच चालण्याचा उगा मोह मी टाळतो
चंद्र येवून सोबतीला मग मिश्कील हसतो
नी वास्तवाचा काळा रंग सारे सांगून जातो

मला मी ...

मला मी सांगू कसा वाटतो
थेंब थेंब जसा रोज साठतो
शब्दास शब्द, हाकेस हाक, कधी नि:स्तब्ध राहतो
जीवनपूजेचा रोज असा मी प्रसाद वाटतो ॥

टाळीला जेव्हा टाळीही मी देतो
खांद्यालाही खांदा सहज मी जुळवतो,
कमवून मित्र अनेक, कधी एक गमवतो
तेव्हा ओढ्यात बसून डबक्यात पाहतो

मला मी सांगू असा वाटतो .....

कधी कुणी भावनांचा वसंतही देतो
तरी पालवी न फुटता, मी मैत्रीतच खुजतो
कधी डोळ्यात नकार साचतोच फार
तेव्हा बरसूनी, इंद्रधनु दिसल्याचा आव आणतो

मला मी सांगू असा वाटतो .....

रोज स्वप्नांच्या यादीसवे मी निघतो
काही गाठतो,काही खोडतो,काही पुन्हा लिहीतो
तरी सायंकाळी मी उरे इतुका एकटा
की एकांतही मजला एकटा सोडतो

एकांत

मज धर्म नसे अवगत,मला देव नसे माहीत
कुणी व्यापतो, एकांत माझा देवच असेल तो कदाचित

एकांतात खरा कुणी कधी एकटा नसतो
कुठे कुठे मी विखुरलेला माझ्यात एक होतो

असे का व्हावे, न व्हावेका कुणी असे वागावे?
वाकूल्या दाखवत प्रश्नासूरअसा खुशाल नाचतो

मग मनाचे ऐकतो,कधी त्याला विनवितो
कधी डोके लढविता छापा-काटा वापरतो
प्रश्न होतात ते छोटे जग वाटते लहान
देवा-धर्माच्या कल्पना मी समाजावर सोपवतो

हा असला चमत्कार अहो नित्याचाच आहे
हल्ली देवळात म्हणे देव एकांत वाटतो
देव असे देव्हार‍यात देव असे गाभार‍यात
वेळ काढून थोडा असा मला भेटे एकांतात

पाटी

कोरा कागद या हाती, कोरी पाटी या मनाची
बोळा आसवांत चिंब, त्याने पाटी पुसायाची
कधी कसले गणित, पाटीवरचे विसरतो
जनी सांगतो कविता, गोष्ट जुन्या हिशोबाची

मुळाक्षरे ती प्रेमाची नी सोबत ती तुझी
आठवण येते त्या फुल्या-गोळ्याच्या खेळाची
वळण नव्हते अक्षरा, नियम न मी जाणी
आतो शिकलो हे सारे पाटी फुटल्यावरती

पाठ दाखवून भूला, काळ्या नभात पाहतो
गोर चांदवा तो , मला 'श्री' सारखा भासतो
मुळाक्षरे मी सारी, चांदण्यात आठवतो
मग कागद भरता, अमावस्या उगवतो

कोणी पुसता मला कसे शब्द जमवितो?
फुटकी ती पाटी, मी डोळ्याआड लपवितो
आता कागदच प्यारे, नी प्यारी ही लेखणी
पाटीवरचे ते सारे कगदावर उतरवतो

नवा मार्ग

भिरकावून दिली जुन्या यशाची घोंगडी
उतरूनी रणी वार सोसण्याची गोडी
अपवाद ठरूनीच नवे विक्रम बनतात
वाट धोपट सोडून मीही रानाकडे दौडी

झाले नाही आधी असे काही करायाचे
सूर्य केव्हाच बुडाला म्हणून नाही झोपायाचे
त्याच्या उगण्याची मीही वाट न पहावी
माझ्या उदयाची तोही घालेल साकडी

असे करणार काही, उन्हे पायांशी टेकावी
कूजगोष्टी करण्यां घरां पाखरे धावावी
चंद्र-तार्यांनीही यावे, नभातून खुणवावे
इच्छाशक्ती ज्याचा सुर्य, अशा त्याची ती झोपडी

विझली वात

उरला हा दिवस कधी नाही कशात
सरले क्षण असे आतल्या आत
लपवून सारे कसे, जाळू या स्मृतींना
गुदमरून जातो जीव, त्यांच्या धुरात

नव्हते जे माझे, असे काही गमावले
तोरण आठवणींचे दारा, मनाच्या लावले
दूर जाण्याचाही मी केला सण साजरा
बडवून ढोल-नगारे, ह्या माझ्या उरात

दिवसाला आता थांबवणे नाही
पावसाला पुन्हा नाही बोलावत
उडवून चार शब्द, दहाहीं दिशांना
गातो कहाणी मी, विरल्या सूरांत

-
केतन

आम्ही शब्दभ्रमर

आम्ही नाही कविता जगवत
कविताच अजरामर

आम्ही शब्दभ्रमर...

स्फ़ुर्ती आमची बोस-टिळक
कधी एखादी 'पतली कमर'

आम्ही शब्दभ्रमर...

आमचे दोनच मार्गदर्शक
इच्छा आणि लहर

आम्ही शब्दभ्रमर...

ह्या कवितेला 'जमीन' आहे
वैशाखातही बहर

आम्ही शब्दभ्रमर...

-चेतन