Aamhi ShabdaBhramar

Friday, December 23, 2005

सांगशील मला कधी?

प्रेमाचा अर्थच नव्हे,
त्याची व्याप्ती सांग मला
मी जे जे अनुभवलं,
प्रेमच म्हणतात का त्याला?

त्याचं दर्शन घेणं,
हा तर केवळ दिनक्रम झाला
डोळे मिटूनही तोच दिसणं,
हा भलताच उपद्रव झाला!

तो असल्यावर प्रसन्न वाटणं,
हा कदाचित योगायोग असावा
तो नसल्यास बेचैन होणं,
ह्याचा अर्थ काय लावावा?

तो कधी हसून बोलला,
आभाळाला हात टेकतात
जाणून बुजून दुर्लक्ष केल्यावर,
पाय जमिनीवर आणतात

मला त्याचा सहवास मिळेल
ही अपेक्षाच मुळी उणी
पण म्हणून का लगेच,
मनाला आवर घालू शकतं कोणी?

त्याला त्याचे प्रेम मिळो,
अडसर नको कधीच
माझ्या वाटेवर मृगजळ होतं,
समजून घे‌इन आधीच

'प्रेमाशिवाय जगणं शून्य',
असं का आहे थोडीच?
'आपण प्रेम करु शकलो', ही भावना,
समाधान दे‌इल नक्कीच!

म्हणून विचारते, खर सांग,
ही जाणीव कसली?
प्रेमंच जर नव्हतं, तर मग,
ही हुरहूर कसली?

0 Comments:

Post a Comment

<< Home