Aamhi ShabdaBhramar

Friday, December 23, 2005

शब्द

आज मनात ठरवलं,
एक 'सुंदर' कविता करुया
गोड-गुलाबी शब्द पेरुन,
तिला जरा नटवूया-सजवूया

पण शब्दच रुसून बसले,
मागे हटून बसले
ओळख दाखवेनासे झाले,
हटवादी मेले, एकेकटे सुचू लागले

त्यांचा ताळमेळ काही लागेना,
अन माझी कविता काही सजेना
खूप मनधरणी करुनही,
ते काही माझं ऐकेनात

मग मी शब्दांचा नाद सोडला,
म्हणाले, खुशाल रुसा बापड्यांनो
किती दिवस ओळख विसराल,
कधीतरी माझी आठवण काढाल

ब-याच उशिरा मग एक कल्पना सुचली,
लिहिताना मधेच निद्रादेवी अवतरली
मग मी निवांत हिंडले स्वप्नदेशात,
अन कविता उशाशी जागत राहिली

पहाटे पहाटे पायाला गुदगुल्या झाल्या,
तेच शब्द एकमेकांशी खेळत होते
डोळे तांबारलेले, चेह-यावर वेडी आशा,
मला जाग आलेली पाहून, वेडे चक्क आनंदी झाले!

0 Comments:

Post a Comment

<< Home