Aamhi ShabdaBhramar

Friday, December 23, 2005

खूप दिवस झाले असतील..

खूप दिवस झाले असतील...
लहाणपणी अंगणात मैत्रिणींसोबत खेळतानामधूनच चिडून उठून गेलीस,
आणि लिंबामागे जाउन लपून बसलीस;
पण कुणीच आलं नाही तुझी समजूत काढायला
मग तुझी तुच उठून गेलीस सरपण आणायला...

खूप दिवस झाले असतील...

आठवतं एकदा पाण्याला गेलेली असतानामधेच आमराईत रेंगाळलीस,
कै-यांच्या आंबटओल्या गंधानं मोहरुन गेलीस
पण, कोकिळेच्या कूजनामागून जेव्हा 'माय'ची हाक आली-
दिस ढळायच्या आत परतण्यासाठी तुझी लगबग सुरू झाली...

खूप दिवस झाले असतील...
तव्यावरची भाकरी तव्यावरच करपली होती
कुणास ठाउक कुठे तू अगदी हरपली होती
मग तू भानावर कशी आली ते तुल ठाउकच आहे
मानेवरचा दाह अजून कुठेतरी खोलवर जळतच आहे..

खूप दिवस झाले असतील...

पत्र्यातून झिरपणा-या चांदण्याकडे बघून
'त्या'ला उठवावं असं मनात आलं असेल दाटून
ते मनातलं चांदणं मनातच साठवून ठेवलंस
मन मारुन जगायचं अंगवळणी पाडून घेतलंस...

खूप दिवस झाले असतील...

खरंच खूप दिवस झाले असतील आता...
आपण खूप सोसलं वगैरे ही जाणीवही नसेल आता
पण, तू साठवून ठेवलेलं चांदणं तुझ्या डोळ्यांतून सांडत असतं
अन तुझीच कहाणी तुझ्याही नकळत गदगदून मांडत असतं...

खूप दिवस झाले असतील...

0 Comments:

Post a Comment

<< Home