Aamhi ShabdaBhramar

Friday, December 23, 2005

कशासाठी जगण्यासाठी …

एक सुंदर गीत हवं, सुख-दु:ख गुंफून गाण्यासाठी,
एक सुरेल सरगम हवी, जीवनाच्या तारा जुळवण्यासाठी ।

एक सच्चा रसिक हवा, समेवर दाद मिळवण्यासाठी,
असं बेभान संगीत हवं, स्वत:ला हरवून बसण्यासाठी ।

एक सुवासिक फूल हवं, आयुष्य सुगंधित करण्यासाठी,
एक खोल श्वास हवा, जगण्यातली अनुभूती घेण्यासाठी ।

एक उराशी स्वप्नं हवं, कल्पनेचे मनोरे रचण्यासाठी,
एक मेहनती क्षण हवा, स्वत:ला कृतार्थ करण्यासाठी ।

एक जहरी अपयश हवं, अहंकार जागेवर आणण्यासाठी,
एक अंधारा कोपरा हवा, आशेचा किरण मिळवण्यासाठी ।

एक रडवणारी धावपळ हवी, स्वत:ला आजमावून पाहण्यासाठी,
एक सशक्त स्थैर्य हव, मनोबल टिकवून धरण्यासाठी ।

एक धगधगता निखारा हवा, जगाची ओळख पटवण्यासाठी,
एक मायेचा पदर हवा, भिजल्या पापण्या टिपण्यासाठी ।

एक उत्स्फूर्त विनोद हवा, ताणतणाव विसरण्यासाठी,
क्वचित एखादा योगायोग हवा, आश्चर्यचकित होण्यासाठी ।

एक खरी मैत्री हवी, अवघड क्षणी सावरण्यासाठी,
एक अखंड साथ हवी, जगणं हवंहवंसं वाटण्यासाठी ।

एक संस्कारित मन हवं, आदर्श घालून देण्यासाठी,
खरोखर एक आयुष्य हवंच, कशासाठी?...जगण्यासाठी ।


0 Comments:

Post a Comment

<< Home