Aamhi ShabdaBhramar

Friday, December 23, 2005

कळलेच नाही!!!

कळलेच नाही!!!
चाफ्याच्या फुलांच्या कधी झाल्या मुंडावळ्याकळलेच नाही!!!
आंब्याच्या तळ्यांचे कधी झाले मांडव डहाळे ... कळलेच नाही
माजघरातल्या अंधारात कधी लागले डोहाळे..... कळलेच नाही
चिंचेची बोरांची कधी लागली जिभेला शिरशिरी.. कळलेच नाही
तांबडं फुटताना दारी कधी आला वासूदेव.... कळलेच नही
रामाच्या मंदिरात कधी सुरू झाली काकड आरती..... कळलेच नाही

शिवपूजनाला बसताना गालावरचे काजळ कधी तोंडभर पसरले.... कळलेच नाही
तरण्या पोरींना घे‌ऊन कधी पारन्या निघालो.....कळलेच नाही
देव चोरताना ताम्हणात कधी सुटली सुपारीची मूठ ...कळलेच नाही
अंगावरची हळद अन.. हातातील कट्यार कधी ओघळली सुटली.... कळलेच नाही
कळलेच नाही कधी तालुक्याच्या गावी सुरू झाले काडीमोड
गावकीच्या जत्रेत भावकीची भांडणे अन एक दोघांचे खून
कळलेच नाहीत
शेता शेतांचे कसे झाले बांध अन.. बांधा बांधांवर कशा आल्या हीरो होंडा
कळलेच नाही, कळलेच नाही
एस. टी. स्थानकासमोर कधी आली चक्री अन सुरू झाला बी‌अर बार
मळीच्या वासाने कारखान्याच्या धुराड्याने पांढरील छेद देत डांबरी सडकेने कसा
साधला डाव कळलेच नाही
कळलेच नाही चावडीवरल्या पेट्रोमक्स वर आले कसे रात किडे
कळलेच नाही
बरवेतला महादेव,वेशीतला मारुती,रानातला खंडोबा, अन गावातला विठोबा
कधी निद्रीस्त झाले कळलेच नाही
टिटवीने साधला डाव, निपचीत पडला माझा गाव
कळलेच नाही, कळलेच नाही

0 Comments:

Post a Comment

<< Home