Aamhi ShabdaBhramar

Saturday, April 08, 2006

बंडखोर -(गझल)

बंडखोर (गझल)

जोडून हात बसले माझ्यासमोर काही
अभिषेक,दान,पूजा करतात चोर काही

बाहेर नाचणारा पाऊस भाववेडा
अन आत पिंजऱ्याच्या रडतात मोर काही

चोरून चंद्र आम्ही झालो पसार जेव्हा
तेव्हा खुळ्या जगाला दिसले चकोर काही

होतो जपून प्रेमे डोळ्यात मी तरीही
वाहून आसवे का गेली मुजोर काही?

घालून धावदोरा आयुष्य जोडताना
सलगी कशी गळ्याशी करतात दोर काही?

तोंडात लेखणीच्या शाई बरीच आहे
( शब्दांत भाव भिजले मिंधे,छचोर काही )

केलास व्यर्थ, कृष्णा! उपदेश अर्जुनाला
सत्संग मांडणारे आहेत 'थोर' काही

सौद्यास दैव आले दारी अखेर माझ्या
हातात फक्त पडले क्षण बंडखोर काही

-नीलहंस

2 Comments:

Post a Comment

<< Home